उत्सव संपन्न भारतीय संस्कृती -५

       सण-उत्सवांची अलौकिक परंपरा असलेली आपली भारतीय संस्कृती आणि अशा महान संस्कृतीचे आपण वारस आहोत याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणे सहाजिकच आहे. वर्षातील प्रत्येक महिन्यामध्ये येणारे आपले सण-उत्सव यामुळे प्रत्येकाच्या जीवनात आनंद द्विगुणित होतो. 

      श्रावण- भाद्रपदाबद्दल जाणून घेतल्यानंतर आजच्या अंकाची सुरुवात अश्विन महिन्याने करते. अश्विन महिना येण्या आधीच घरातील वातावरण बदलून गेले असते कारण अश्विन प्रतिपदा म्हणजे घटस्थापना आणि घटस्थापना करायची म्हणजे घरातील सर्व साफसफाई पासून सुरुवात होते. प्रतिपदेपासून येणारे पुढील नऊ दिवस आई जगदंबेची उपासना करायची आहे. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली महाशक्ती अनुक्रमे तीन तीन दिवस या तीनही रूपाची उपासना करून बुद्धी, वित्त शक्तीची प्रार्थना जगदंबे कडे करणे असे नवरात्र उत्सवाचे स्वरूप.

      पण खेदाची गोष्ट अशी की हे खरे स्वरूप आज समाजातून नष्ट झालेले दिसून येते आणि त्याऐवजी केवळ दिखावा दिसून येतो. पण आजच्या समाजासमोर, तरुण पिढीसमोर आणि पुढील पिढीपर्यंत नवरात्र उत्सवाचे खरे स्वरूप पोहोचवण्याची जबाबदारी आपली देखील आहे अशा विचारातूनच उत्सवांच्या अंकाचे लिखाण सुरू झाले आहे. 

        अश्विन मास साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येतो आणि या सणांबरोबरच इंग्रजी महिन्यानुसार येणारे सण हे देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. राष्ट्रपिता गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती तीसुद्धा तेवढ्याच उत्साहाने आपण साजरी करतो. ज्यांनी आपल्या राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले अशा महान व्यक्ती प्रति आपण कृतज्ञता भाव व्यक्त केलाच पाहिजे.

        अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा असत्यावर सत्याचा विजय झाल्याचा हा दिवस. देवीने याच दिवशी असुराचा नाश केला, प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, पांडवांनी आपली शस्त्रे हातात घेतली त्यामुळे शस्त्राची, अवजारांची पूजा करण्याची प्रथा आहे. एकमेकांना सोने देऊन शुभेच्छा देण्यात एक वेगळाच आनंद मनाला स्पर्शून जातो. संपूर्ण वर्षभरातील सर्वात मोठा सण पुढे येणार आहे त्याची सुरुवात पुढील अंकात करूया.

धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *